Thursday, October 03, 2019

स्वयंप्रकाशित, शाश्वत सावली

सर्वप्रथम, 'हिमालयाची सावली' च्या नव्या टीमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. त्यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा धोका पत्करून या नाटकाचे घडवून आणलेले पुनरागमन लाख मोलाचे आहे. भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या हिमायला एवढ्या उत्तुंग समाजकार्याची, पदमश्री वसंत कानेटकरांच्या अभिजात, अलौकिक, प्रयोगशील लेखनाची तसेच डॉ. लागू-शांता जोग-अशोक सराफ या अवीट गोडीच्या ओरिजिनल कास्टची (आम्हाला त्यांचा नाट्याविष्काराची जादू अनुभवण्याचे भाग्य लाभले नसले तरी त्यांच्या गरुडभरारीची कल्पना आहे) जनमानसाला निव्वळ स्मरण करून देणे हीच मुळात कौतुकास्पद कामगिरी आहे.या धाडसी गिर्यारोहणाचा धडा इतर नाट्य निर्मात्यांनी गिरवण्याजोगा आहे.



कानेटकरांनी नाटकाच्या आशयसंपन्न निवेदनात एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या संधीकाळातील डोंगराएवढी अनेकविध माणसे, त्यांच्या जीवनप्रेरणा आणि त्यांच्या पुढील आव्हानांचा सखोल अभ्यास करून, वास्तविक आणि काल्पनिक यांची सरमिसळ करून, 'हिमालयाची सावली' लिहिल्याचे म्हटले आहे तरी गुंडो गोविंद उर्फ नानासाहेब भानू या हिमालयासमान उत्तुंग पात्रामध्ये आपल्याला प्रामुख्याने महर्षी कर्वेच दिसतात. म्हणून वि. स. खांडेकर पुस्तकाच्या मलपृष्ठावरील ब्लॅर्ब् मध्ये असे सुचवतात की कदाचित मूळ चरित्राचा आत्मा कायम ठेवून बाकीचे सारे चरित्रापासून दूर नेणे हा एक इष्ट पर्याय ठरू शकतो, कारण केवळ नावे, नाती, व्यवसाय इत्यादी गोष्टी बदलून फार मोठा बदल घडून येत नाही. पण हे अनुषंगाने झालेले विचार मंथन होय. खांडेकरांनी या नाटकाचा आत्मा अचूक ओळखला आहे. ड्रिंकवॉटर आणि शेरवूड यांच्या अब्रॅहम लिंकनवरच्या नाटकांचा दाखला देत वृद्ध नायक-नायिका यांच्या भोवती गुंफलेल्या कथानकांचा नवीन पायंडा घालणारे तसेच वाईट आणि चांगले यांच्या संघर्षा पेक्षा चांगले आणि अधिक चांगले यांचा संघर्ष रंगविणारे नाटक म्हणून 'हिमालयाची सावली' चा नेटक्या शब्दांत गुणगौरव केला आहे.

प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य कानेटकरांच्या सहज सुंदर शैलीत आहेच, पण प्रसंगोचित संवाद लिहिण्याच्या त्यांच्या हातोटीला तोड नाही. उदाहरणार्थ, महर्षी कर्वे आणि एस.एन.डी.टी. युनिव्हर्सिटी च्या खऱ्या घटनेला कल्पनेची नाट्यमय जोड देऊन त्यांनी थोर समाजसेवींच्या जीवनात संघर्ष कसा अटळच नव्हे तर सर्वव्यापी असतो हे दाखवले आहे, संघर्षाचे असे अनेक अदृश्य थर असतात जे एका समर्पित संस्थापकाला त्याचाच संस्थेत सोयीस्करपणे आणि बेमालूमपणे उपरा ठरवताना मागेपुढे पाहत नाही. नायकाचा पक्षघात आणि शेवटी शरीराची साथ नसतानाही कर्मयोगी मठावर जाण्याचा निर्णय या काल्पनिक प्रसंगांचे औचित्य कानेटकरांच्याच ओजस्वी शब्दांत समजून घेणे इष्ट ठरेल, "संस्थेसाठी सर्वसंगपरित्याग करणाऱ्या माणसाची शेवटची दौलत म्हणजे शरीरप्रकृती. ती सुद्धा हिरावून घेतलेल्या नियतीपुढे भानू शरण जात नाही. ते आपला अपंग देहसुद्धा नव्या संकल्पासाठी समर्पित वृत्तीने कामी लावतात. अशा समर्पित झोकुन दिलेल्या माणसाची ग्रीक वा शेक्सपीरिअन पद्धतीची ट्रॅजेडी होऊच शकत नाही. अशा माणसांच्या जीवनकहाणीत 'ट्रॅजिक एरर" संभवूच शकत नाही. फार तर त्याला "ट्रॅजिक चॉईस" असे म्हणता येईल. अशा माणसांपुढे त्यांचे दैवच लुळेपांगळे होऊन त्यांच्या पायाशी ओघळून पडते."

नाटकाची प्रासंगिक कथा एकमेकात अनिवार्यपणे गुंतलेल्या दोन विश्वांची आहे - एकीकडे नानासाहेबांनी अबला, अजाण, विधवा महिलांच्या उद्धारासाठी उभा केलेला आश्रम आहे, दुसरी कडे त्यांच्या पत्नी-मुलांचा संसार आहे. दोहोंची जबाबदारी नानांवर असली तरी त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता मात्र केवळ आश्रमाच्या अंगणाला आपले धर्मक्षेत्र मानते. स्वतःच्या मुलांच्या भविष्याची चिंता तसेच घराच्या जमा-खर्चाची तरतूद त्यांची पत्नी एकट्याने कसेबसे करीत आहे. त्यासाठी नानांची साथ तर सोडाच, नानाविध अडथळे वाटेत उभे आहेत. या नवरा बायकोच्या दैनंदिन संघर्षाभोवती इतर सर्व वितंड वाद आणि भांडण तंटे घडत राहतात. त्यात त्यांच्या लग्नानेच मुळी दोहोंना समाजाकडून बहिष्कार आणि मानसिक छळ भेट म्हणून मिळवून दिला आहे. कारण ती मुळात विधवा असून, नानासाहेबांनी आपले सामाजिक कर्तव्य जाणून पहिल्या पत्नीचा अकाली निधनानंतर तिच्याशी विवाह केला आहे.

त्याग, सचोटी, कर्मठपणासारखे गुण ज्यांना उपजत लाभले आहेत असे नानासाहेब आणि सतत व्यवहाराचे महत्व सांगण्याऱ्या पण नेमक्या वेळी तितकाच करारीपणा अंगी बाळगण्याऱ्या त्यांच्या पत्नी सावित्रीची म्हणजेच बयोची महती सांगणारे तीन अंकी नाटक बसवणे आजच्या काळात तारेवरची कसरत नव्हे तर आत्मघातकी प्रयोग मानला जाईल. निर्माता आणि दिग्दर्शक यांनी नानासाहेब म्हणून नटवर्य शरद पोंक्षे यांच्यावर टाकलेला विश्वास म्हणूनच विलक्षण ठरतो आणि विधिलिखितही. वैयक्तिक जीवनातील आघातांवर यशस्वीपणे मात करणाऱ्या पोंक्षेंनी आपल्या वैचारिक प्रगल्भतेच्या जोरावर प्रत्येक हालचालीतून आणि संवादातून नानासाहेब समर्थपणे उभे केले आहेत. सावरकर भक्त पोंक्षे अगदी लीलया १९२० च्या काळात जाऊन पोहोचतात, त्याला आपलंस करतात.

कानेटकरांचे नानासाहेब हे एक अत्यंत दुर्मिळ रसायन आहे: त्यांच्या प्रत्येक हालचालीला कारुण्याची झालर प्राप्त झाली आहे, पण तिथे सहानुभूतीची अपेक्षा ठेवणारी याचना नाही, त्यांच्या मतमांडणीत ठायी ठायी युगपुरुषाचा बाणा दिसतो पण अहंकाराचा लवलेश नाही, त्यांच्या हट्टीपणाला अतिरेकाचा श्राप असेल पण त्याची तर्कशुध्द्ता निर्विवाद आहे. पोंक्षे हे सर्व कंगोरे आपल्या बावनकशी अभिनयाने जिवंत करतात. त्यांचा स्टेजवरील वावर तपस्वी नायकाला शोभून दिसेल असा नाट्यमय आहे, पण नाटकी नाही. बयोची वाजंत्री सुरु होताच किंवा आपल्या विरुद्ध घर पेटून उठले आहे हे लक्षात येताच त्यांचे "अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे" गुणगुणत शून्य नजरेने भिंतीकडे बघणे दीर्घ काळ स्मरणात राहील. आपणच उभ्या केलेल्या संस्थेत, ज्याला ते त्यांचे एकमेव घर मानीत आले, तिथेच पोरके झाल्याची जाणीव, एकीकडे काळाची गरज म्हणत आश्रम सोडण्याची तयारी तर दुसरीकडे टप्प्या टप्याने खचत चाललेला धीर,आणि या विषमंथनात ओढवलेला अर्धांगवायूचा झटका - हे सारे पोंक्षे मोठ्या कौशल्याने प्रेक्षकांसमोर आपल्या संवादातून, देहबोलीतून व्यक्त करतात. नानासाहेबांचा निर्धार, द्रष्टेपणा, अलिप्तता, अगतिकता, नैराश्य आणि वेदना एकाचवेळी उलगडत रंगमंचाला धन्य करून सोडतात. त्यांचे जड जीभेनं, वेगवेगळ्या पद्धतीनं आणि अनोख्या आविर्भावासह "त्याचं काय आहे.." उच्चारणे कानेटकरांच्या लेखणीला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देतं (पक्षघात होतेवेळी जे शब्द नानासाहेबांचा ओठावर होते तेच पुढे त्यांचे पालुपद झाले हे कानेटकरांनी अतिशय खुबीने योजिले आहे.)

हिमालयाची 'सावली' हीच नाटकाचा खरा आधारस्तंभ. बयोची शिवराळ भाषा, नारळासमान स्वभाववैशिष्ट्ये, आणि समाज आपल्या नवऱ्याला गृहीत धरत आहे असे जाणवताच त्याच्या वतीने तिने धारण केलेले रौद्र रूप, अभिनेत्री श्रुजा प्रभुदेसाई यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे चितारले आहे. अनेक प्रसांगातुन सहज सुंदर अभिनयाचा कळस देखील गाठला आहे, पण त्या काय किंवा तातोची भूमिका साकारणारे गुणी कलावंत विग्नेश जोशी काय - अनेक प्रसंगातून नाहक लाऊड होण्याचा मोह टाळताना दिसत नाहीत. 

बयो ही काही साधारण नायिका नव्हे. नरहर कुंरुंदकर यांनी तिच्या संदर्भात अतिशय समर्पक शब्दांत म्हटले आहे, "वरवर पाहता तर असे दिसते की,आर्य-पतिव्रतेप्रमाणे ज्याच्या गळ्यात माळ घातली त्याच्याशी बयो एकनिष्ठ आहे. बारकाईने पाहिले तर असे दिसेल की, बयो ह्या अस्थिचर्ममय भानूंशी बांधलेली नाही. तिची आद्यनिष्ठा भानूंच्या ध्येयवादाशी आहे. हा ह्या नाटकातील अखंड असणारा योग आहे... जीवनाला कर्मयोग्यांचा कर्मयोग पुरतो. ललित वाङ्मयाला केवळ हा कर्मयोग पुरत नाही. त्या कर्मयोग्याच्या व्यक्तित्वात एक सामान्यही दडलेला असतो. तो जळताना आक्रोश करतो आणि ह्या दहनातून शुद्ध होत जातो. शिवाजीचा आक्रोश, संभाजीचा आक्रोश अगर भीष्माचा आक्रोश व्यक्त करणारी प्रतिमूर्ती त्या ठिकाणी उभी करता येणे शक्य नसते. बयोमुळे हिमालयही उभा राहिला आहे, नाटकही उभे राहिले आहे आणि बयो तर उभीच आहे." अशी बयो साकार करण्याची संधी प्रभुदेसाई यांना लाभली आहे, त्यांनी तिचे सोने करावे.

तसेच तातोबा आणि नानासाहेबांचा एकमेकांवरील विश्वास म्हणजे एक अभेद्य दुर्ग आहे. प्रामाणिकतेच्या कसोटीवर बेरकी स्वभावाचा आणि उथळ प्रकृतीचा तातोबा हा बयोइतकाच खरा उतरतो, त्यामुळे तो या नाटकाचा एक अविभाज्य घटक आहे. तातो ची एन्ट्री झोकात होते, जोशींनी तातो चा बेरकीपणा उत्तम वठवलाय पण जसं जसं नाटक पुढे सरकतं ते इष्टतम (ऑप्टिमल) इफेक्ट साधताना कमी पडतात, ओव्हर द टॉप होण्याकडे त्यांचा कल दिसतो. पात्राची बोली भाषा आत्मसात केली किंवा विशिष्ट हेल काढले, तुज मज तिज केले, की आपोआप कथानकाचा काळ उभा राहात नाही, तो व्यक्त-अव्यक्त बोलीतुन तितकाच समर्थपणे घडवावा लागतो. त्यासाठी पोंक्षेंच्या अभिनयाचा बारकाईने अभ्यास करावा.

नाटकाच्या इतर पात्रांनी आपले काम चोख निभावले नाही असे म्हणणे अन्यायकारक ठरेल. त्यांचे प्रयत्न नक्कीच प्रामाणिक वाटतात, दिग्दर्शकाने घेतलेल्या मेहनतीचा देखील प्रत्यय येतो, पण काही प्रवास अजून घडायचा राहून गेलाय याची जाणीव होते. आपले संवाद न अडखळता एका दमात म्हणणे यापलीकडे जे जे म्हणून गुण असतात ते अभिनयाला बावनकशी करण्याच्या मार्ग दाखवतात. पण त्यासाठी तालमीच्या जोडीला आत्मनिरीक्षण हवे आणि पोंक्षे प्रभुतींचे मार्गदर्शन हवे. एन्ट्री-एक्सिट घेताना नकळत आलेला यांत्रिकपणा, स्टेज वर आपला संवाद नसताना किंवा स्तब्ध उभे राहताना कोणते पात्र थिजल्यासारखे दिसत आहे, चुकून प्रेक्षकांकडेच बघत आहे किंवा कोणाचा प्रसंगाला अनुरूप नसलेला वावर घडतोय हे सर्व चाणाक्ष प्रेक्षकांच्या नजरेतून कधीच सुटत नाही हे ध्यानात ठेवावे.

ज्या ज्या प्रसंगांमध्ये अंगविक्षेप किंवा  पाठीवर धपाटे, खाणाखुणा, आदळआपट या सारखे तत्सम प्रकार घडतात,  तिथे प्रेक्षकांत हमखास हंशा पिकतो, दाद मिळते. पण त्या प्रतिसादाला नको तितका मान देण्याची मुळीच गरज नसते. थोडा संयम बाळगला तरीही संहितेला अपेक्षित इफेक्ट साध्य होऊ शकेल, त्यासाठी व्यक्तिरेखेची लक्ष्मण रेखा ओलांडण्याचे कारण नाही. बयो आणि तातो मुळात उथळ, फटकळ असल्यामुळे त्यांना अंडरप्लेची गरज नाही हे मान्य आहे पण प्रत्येक वेळी हाव भाव, इशारे किंवा संवाद अंडरलाईन करण्याचीही गरज नाही.आणि प्रेक्षकांच्या हलक्या, क्षणिक प्रतिसादाला निदान यशाची पावती मानू नये. कारण तुमच्या याच रसिकांपैकी अनेक महाभाग एकीकडे तुम्हाला दाद देत असतात तर दुसरीकडे प्रत्येक घासाचा बीभत्स आवाज करीत वडा पाव, वेफर आणि सँडविच रिचवत असतात, आणि सर्रास मोबाइल फोनच्या रिंगटोन्सची स्वतंत्र मैफल सभागृहात गाजवत असतात. त्यांच्या पायी लेखकाने आखून दिलेल्या पात्रांच्या चाकोरीबाहेर उगीच पसरू नये,सांडू नये.

संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य कानेटकरांनी सविस्तर वर्णिलेल्या घर, दार, ओसरी, पडवीनजीकची रहाटाची विहीर, साहेबी थाटाचा कॅम्प मधील बंगला इत्यादी सूक्ष्म तपशीलाशी इमान राखतो. बेंद्रेंचा कल्पनाविष्कार नक्कीच नाटकाच्या जमेच्या बाजूंमध्ये गणला जाईल. श्याम चव्हाणांची प्रकाश योजना, राहुल रानडे यांचे संगीत, मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि शरद सावंत यांची रंगभूषा नेटकी आहे, नाट्यकृतीचा पोत या मंडळींनी अभ्यासला आहे. तरीही असे वाटत राहते कि संगीतातून अजून थोडे वैविध्य आणले तर नाट्यमय प्रसंग अजून प्रगल्भ होतील. काही ठिकाणी संगीताचे सूर नाहक नानासाहेबांचे स्वर खाऊन टाकतात, किमान ते तरी टाळावे.

व्यावसायिक चौकटीतला अशा धाटणीचा प्रयोग म्हटला कि टोकाच्या प्रतिक्रिया आपसूकच येतात. एकीकडॆ ‘लाईक करा आणि शेयर करा’ तत्वावर प्रेमाचा फेसबुकछाप वर्षाव होतो (झकास, जिंकलस मित्रा, सॉलिड, फुल्ल टू या नसा तडकावणाऱ्या विशेषणांसकट) तर दुसरीकडे (गौतम) गंभीर चेहऱ्याचे, आणि जाड भिंगाचा वरचष्मा मिरवणाऱ्या समीक्षक प्रजातीच्या काही नमुन्यांच्या तिखट नोंदी होतात, मुळात १०० टक्के व्यावसायिक असलेले असे नमुने ज्यांना 'व्यावसायिक' असा नुसता शब्द कानी पडताच पोटात कलमलल्यासारखे होऊन त्या शापित शब्दाला कसाब शैलीत गोळ्या झाडण्यात ते आपले कसब मोजतात व मानतात.

या दोन्ही परस्परविरुद्ध परमाणू हल्ल्यांची झळ या नाटकाला बसू नये असे मनापासून वाटते. दोन्ही आघात वेगवेगळ्या अर्थाने बेजार करून सोडतात आणि पुढची प्रगती थांबवतात, नुसताच प्रवास घडत राहतो. ‘हिमालयाची सावलीचे’ असे होऊ नये, या नाटकाचे अगणित प्रयोग होवोत आणि त्यांत उत्तरोत्तर प्रगती घडो ही इच्छा. आणि त्यानिमित्ताने का होईना शाळा कॉलेज मधील मुलंमुली महर्षी कर्वे आणि त्यांच्या प्रतिभावान आणि नि:स्वार्थ कुटुंबीयांविषयी अधिक माहिती मिळवो ही आशा.

सरते शेवटी वेगवेगळ्या सिहांसनांवर आरूढ झालेल्या आपल्याकडील समीक्षकांना असे सुचवावेसे वाटते की कानेटकरांच्या व्यावसायिक यशाने कमालीचे अस्वस्थ होण्या पेक्षा, 'माणसाला डंख मातीचा' लिहून कानेटकर कसे घसरले असा टाहो फोडण्यापेक्षा, किंवा त्यांनी मध्यमवर्गाला कसे रिझवले असा बिनबुडाचा आरोप करण्यापेक्षा त्यांच्या विपुल साहित्यातील प्रयोगशीलतेचा, एखाद्या उद्दात हेतूने झपाटलेल्या असामान्य, धीरोदात्त व्यक्तिमत्वांचा शोध घेणाऱ्या त्यांच्या स्वभावाचा, संगीत नाटकाला पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी केलेल्या बहुमोल योगदानाचा, आणि प्रेक्षकांना कलाविष्काराचे अविभाज्य अंग समजणाऱ्या त्यांच्या वृत्तीचा आणि विचारांचा सखोल अभ्यास करावा .